“अगं गीता, लिंबाच्या चार कोवळ्या डहाळ्या काढ. उद्या गुढीपाडवा आहे,गुढीला लावायला आणि निंबाच्या चटणीला लागतील ना.” अशी वाक्यं आपण आपल्या लहानपणापासून नेहमीच ऐकली आहेत आणि कडुनिंबाची कोवळी पाने-फुले, ओवा, हिंग, मिरी, मीठ, गूळ घालून केलेली स्वादिष्ट रोगनाशक चटणी खाऊन मराठी नववर्षाची सुरूवातही केली आहे. ‘चांदोबा चांदोबा भागलास का? निंबोणीच्या झाडामागे लपलास का?’ हे गाणं अगणित वेळा ऐकत - म्हणत आपलं बालपण गेलं आहे. हे लिंब किंवा निंबोणीचं झाड म्हणजेच कडुनिंब. ३० ते ६० फूट उंचीचं हे छायादार, शीतल विषुववृत्तीय झाड. मूळचं भारतीय उपखंडातलं म्हणजे भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ इथं सर्वत्र आढळतं. तिथूनच ते ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अमेरिका इथं गेलं. आंध्रप्रदेशाचा तर हा राज्यवृक्ष आहे. आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्रात याची खूप झाडं जागोजागी दिसतात.अनेक भाषांमध्ये याची अनेक नावं आहेत, जसं की इंग्रजीत Indian Lilak, Neem, Margosa,मराठीत कडुनिंब, संस्कृतमध्ये निंब, तिक्तक, अरिष्ट, पारिभद्र, हिंदीमध्ये नीम, कन्नडमध्ये बेवु, गुजरातीत लींबडो, तामिळमध्ये कड्डपगै, तेलगुत न...