कडुनिंब
“अगं गीता, लिंबाच्या चार कोवळ्या डहाळ्या काढ. उद्या गुढीपाडवा आहे,गुढीला लावायला आणि निंबाच्या चटणीला लागतील ना.” अशी वाक्यं आपण आपल्या लहानपणापासून नेहमीच ऐकली आहेत आणि कडुनिंबाची कोवळी पाने-फुले, ओवा, हिंग, मिरी, मीठ, गूळ घालून केलेली स्वादिष्ट रोगनाशक चटणी खाऊन मराठी नववर्षाची सुरूवातही केली आहे. ‘चांदोबा चांदोबा भागलास का? निंबोणीच्या झाडामागे लपलास का?’ हे गाणं अगणित वेळा ऐकत - म्हणत आपलं बालपण गेलं आहे. हे लिंब किंवा निंबोणीचं झाड म्हणजेच कडुनिंब. ३० ते ६० फूट उंचीचं हे छायादार, शीतल विषुववृत्तीय झाड. मूळचं भारतीय उपखंडातलं म्हणजे भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ इथं सर्वत्र आढळतं. तिथूनच ते ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अमेरिका इथं गेलं.
आंध्रप्रदेशाचा तर हा राज्यवृक्ष आहे. आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्रात याची खूप झाडं जागोजागी दिसतात.अनेक भाषांमध्ये याची अनेक नावं आहेत, जसं की इंग्रजीत Indian Lilak, Neem, Margosa,मराठीत कडुनिंब, संस्कृतमध्ये निंब, तिक्तक, अरिष्ट, पारिभद्र, हिंदीमध्ये नीम, कन्नडमध्ये बेवु, गुजरातीत लींबडो, तामिळमध्ये कड्डपगै, तेलगुत निम्बमु, बंगालीत नीमगाछ, पंजाबीत नीम्म, मल्याळममध्ये वेप्पु वगैरे.याच्या चार मुख्य जाती आहेत. याची तुलना पारिजातकाच्या झाडाशी केली जाते. पक्व निंबाचा सुगंध चंदनाप्रमाणं असतो असं देखील कोणी कोणी म्हणतात.
आपल्या देशात हे झाड बागेत, रस्त्याकडेला किंवा दक्षिण भारतात देवळात आवर्जून लावलं जाणारं. क्वचित घराच्या अंगणात- परसात सुद्धा असणारं एक सुंदर कल्पतरू अर्थात Tree of miracle. नाव वाचून अचंबित झालात ना? पण खरंच हे झाड म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे. भारतीय जंगलांमध्ये हे झाड आढळतं. भारतात कोरकू, डांग तर न्यूझीलंडमधील माओरी ह्या आदिवासींना त्याचे असंख्य औषधी उपयोग माहिती आहेत. काही भारतीय आदिवासींच्या कुलदैवताचं स्थान निंबाला दिलं गेलं आहे.
विशाल, दीर्घायु, निवारा - सावली देणारं हे झाड जवळपास सर्व प्रकारच्या जमिनीत वाढू शकतं. अतिथंड तापमान सोडून कोणत्याही तापमानाला आरामात वाढतं. दुष्काळातही तगून राहतं. जागतिक तापमानवाढ अर्थात ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न सोडवायला हे झाड महत्त्वाचं आहे हे सिध्द झालं आहे म्हणून संयुक्त राष्ट्रसंघानं कडुनिंबाला एकविसाव्या शतकाचं झाड म्हणून घोषित केलंय.
हे महॉगनी कुळातलं झाड. याचं वनस्पतीशास्त्रीय नाव अँजाडिरक्टा इंडिका. आधुनिक विज्ञानाने सुद्धा निंबामध्ये मार्गोसिन, निम्बिडिन, निम्बोस्टेरॉल, निम्बिनिन ही व इतर औषधी द्रव्ये असतात असे सिद्ध केले आहे. १९९८ मध्ये भारतात भरलेल्या फार्मास्युटिकल प्रतिनिधींच्या महासभेप्रीत्यर्थ कडुनिंबाचे पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले गेले.
निंबवृक्षांच्या बाहुल्यामुळं गावांना निमगाव, निमाड, नीमपुरा, नीमच अशी नावं दिलेली दिसतात. अरवली पर्वताच्या छायेत असलेल्या जेमतेम १५०० लोकसंख्येच्या पद्मपुरा गावामध्ये तब्बल २५००० निंबाची झाडं आहेत. हे गाव नीमवाला गाँव म्हणून ओळखतात. इथं निंब तोडला तर दंड आणि शिक्षा दोन्ही दिले जातात. भोपाळमध्ये १९९५ सालापासून एका भाग्यवान निंबाचा वाढदिवस साजरा केला जातो. खरंतर ही वृक्षविषयक जाणीव काही लोकांना आहे, ती आपल्याला सुद्धा होणं फार आवश्यक आहे.
संस्कृतमध्ये न दुर्जनः साधुदशामुपैति बहुप्रकारैरपि भिक्ष्यमाणः। आमूलसिक्तः पयसा घ्रुतेन न निम्ब व्रुक्षो मधुरत्वमेति।। ह्या श्लोकात त्याच्या कडूपणामुळे त्याला दुर्जनाची उपमा दिली असली तरी ती अजिबात योग्य नाही कारण ह्या कडूपणात असणारे उपयुक्त गुणधर्म. अशा ह्या निंबाचा प्रत्येक भाग म्हणजे निंबफुलं, पानं, कोवळ्या फांद्या, लिंबोण्या, बिया, लाकूड, साल, डिंक, लिंबोण्यांचं तेल सगळंच उपयुक्त. शेतीत सुद्धा ह्याचे बरेच उपयोग केले जातात. पूर्वीपासून घराच्या एखाद्या तरी दरवाजा किंवा खिडकीची चौकट निंबाची बनवण्याची पद्धत आहे.कडुनिंबाचे लाकूड फर्निचर बनवायला सुद्धा वापरतात. ह्याच्या कोवळ्या काड्या दातवण म्हणून वापरतात. साठवणीच्या धान्यांमध्ये कडुनिंबाची पानं ठेवून ती धान्यं टिकवून ठेवण्याचं तंत्र भारतीय स्त्रीला कित्येक वर्षांपासून माहिती आहे. आयुर्वेदाला ४००० वर्षांपासून तो सर्वरोगनिरामय म्हणून माहिती आहे. भावप्रकाश ग्रंथात निंबावर पानंच्या पानं लिहीली आहेत. त्वचारोग, सर्व प्रकारचे ज्वर ह्यांवर हा गुणकारी आहे असं सांगितलं आहे. त्याचा प्रत्यय मी स्वतः घेतला आहे. कोणत्याही औषधानं न जाणारा माझा ताप एका काढ्यानं गेला ज्यामध्ये कडुनिंब हा मुख्य घटक होता. एकंदरीतच हा रोगघ्न, जंतुघ्न आहे.
असा हा कडुनिंब सदासर्वदा मनाला आनंद देतो. कधी त्याच्या हिरव्यागार करवतकाठी पानांच्या नक्षीकामातून दिसणारे निळे आकाशाचे तुकडे मोजा, कधी उन्हाळ्यात दुपारी त्याच्या थंडगार छायेखाली बसून शांततेचा अनुभव घ्या, कधी त्याच्या फांदीवर चाललेली खारूताईची धावपळ बघा, कधी हिवाळ्यात वितराग विरागी होऊन पानांचा संभार टाकून दिलेल्या त्याच्या निष्पर्ण फाद्यांवरच्या विविधरंगी पक्ष्यांना निरखत बसा , कधी त्याच्या शेंड्यावर बसलेल्या अन् लिंबोण्या खाणार्या कावळोबांची निरर्थक कावकाव ऐका तर कधी पाऊसधारा त्याच्या फांद्यांवरून कोसळताना बघा, वसंतात शुभ्र निंबफुलांचा मंद गंध मनमुराद घ्या. कावळ्यांनी निंबाच्या शेंड्यावर घरटं करणं म्हणजे पुढच्या सम्रुद्धीची नांदीच असते असं आदरणीय मारूती चित्तमपल्ली ह्यांनी सांगितलं आहे.
अशा ह्या कडुनिंबाचे साहित्य जगतात सुद्धा अनेक चाहते आहेत. नीम का पौधा -गीत चतुर्वेदी, नीम- सुभद्राकुमारी चौहान, नीम के फूल- कुंवर नारायण, Neem tree on rocks -गजानन मिश्रा ही काही कवितांची उदाहरणं. The neem tree ह्या नावानं असलेल्या एल्सा काझी, असितकुमार संन्याल, किशोरकुमार दास ह्यांच्या कविता मनाला खूप भावून जातात. असितकुमार संन्याल आपल्या कवितेत निंबाची तुलना आपल्या पत्नीशी करतात. एक neem tree घरात आणि एक घराबाहेर आहे असं म्हणतात. दोन्ही अत्यंत उपयुक्त पण दुर्लक्षिले गेलेले असंही ते पुढे म्हणतात. खरंच ही अनास्था दूर होईल, ह्या आशेसह हे निंबपुराण इथं थांबवते.
- सौ.अनघा गजानन सांगरूळकर
anaghasangrulkar@gmail.com
Comments
Post a Comment