मिलेटस- देवधान्ये, जादुई धान्य, श्रीधान्य

 एकदा तांदूळ आणि नाचणीचे (Finger Millet) भांडण लागते. नाचणी म्हणते मी सगळ्यात चांगली. तांदूळ म्हणतो मी महान. ते दोघे न्यायासाठी धर्मराजकडे जातात. राजा दोघांना तुरुंगात टाकतो. काही महिन्यांनी जेव्हा दोन्ही धान्यं बाहेर काढली जातात तेव्हा तांदूळ खराब झालेला असतो, मात्र नाचणी तशीच असते. ह्या गोष्टीतून कळतं की, नाचणी जास्त काळ टिकणारं धान्य आहे, म्हणजेच लोकांचं धान्य आहे. म्हणून ह्या वर्गातील धान्यांना रामधान्ये म्हणतात. कारण राम हा लोकांचा राजा होता. भारतातील काही राज्यांमध्ये मिलेटला देवधान्ये किंवा श्रीधान्ये (समृद्धी देणारे) म्हणतात. 


महाराष्ट्रात मिलेटसाठी पोषकधान्य हा शब्द रुजत आहे.

इंग्रजीत त्यांना मिलेट (Millet) म्हणतात. मिनी म्हणजेच लहान आकाराच्या एका  दाण्यापासून असंख्य दाणे मिळवता येतात. अगदी यजुर्वेदमध्ये मिलेटबद्दल लिहिलेले आढळते. याचाच अर्थ भारतात कांस्ययुगापासून मिलेट खाल्ले जाते.(इ.स.पूर्व ४५००). भारताव्यतिरिक्त आफ्रिका, चीन, जापान, कोरिया आदी देशांमध्ये फार पूर्वीपासून मिलेट खाल्ले जात असल्याचे पुरावे आढळतात. थोडक्यात काय तर आपले पूर्वज तांदूळ व गहू न खाता मिलेट खात होते. मिलेटमध्ये प्रमुख मोठे (Major) मिलेट व धाकटे (Minor) मिलेट अशी वर्गवारी करतात.  मोठ्या मिलेटमध्ये ज्वारी (Sorghum), बाजरी (pearl millet) हे तर धाकट्या मध्ये नाचणी(finger millet), वरई(Little millet), राळा(foxtail millet), सावा (Barnyard millet), कोदो (kodo millet), ब्राऊन टॉप (हरी कांगणी) मिलेट, प्रोसो(चेनी) मिलेट अशी एकूण नऊ मिलेट आहेत. भारतीय कदन्न अनुसंधान संस्थान  (Indian Institute of Millets Research) नावाची संस्था हैदराबाद मध्ये कार्यरत आहे. २०२३ हे वर्ष जागतिक मिलेट वर्ष आहे. Odisha Millets Mission अंतर्गत ओडीसा सरकार शिधापत्रिकेवर (Ration Card) नाचणीचे वाटप करते. अन्नसुरक्षासोबतच, पोषण सुरक्षा, आरोग्य सुरक्षा, निसर्ग संवर्धन व संरक्षण, शेतकरी उपजीविका, जनावरांच्या चाऱ्याची सुरक्षा एवढी असंख्य कामे फक्त एकटे मिलेट करतात. जगभरात तसेच भारतात मिलेट जागरूकतेवर मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. अनेक शहरवासीयांच्या आहारात मिलेटचा समावेश  वाढला आहे.


मिलेट आहारातून जाण्याची मुख्य कारणे:

भारताच्या प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे मिलेट घेतले जात असत. मात्र स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ज्या प्रकारे आपल्या देशात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्या त्या प्रमाणात लागवडीखालील असलेल्या गव्हाचे आणि तांदळाचे उत्पादन वाढू लागले.

आपण जर पाहिले तर साधारण १९७० आणि ७१च्या काळात एकूण अन्नधान्य लागवडीपैकी ४५.९ टक्के एवढी मिलेट लागवड होती.




मात्र १९९६मध्ये तीच लागवड ३१.५ टक्क्यावर आली. याचाच अर्थ असा की तांदूळ आणि गव्हाच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली शिवाय पीडीएफ सिस्टम वर म्हणजेच शिधापत्रिकेवर संपूर्ण देशात गहू आणि तांदूळच दिला जाऊ लागला त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मिलेट्स मधून मिळणारे उत्पादन कमी झाल्याने गहू व तांदूळ लागवडीला सुरुवात केली

आता आम्ही ज्या ज्या गावांमध्ये मिलेटविषयी चौकशी करतो तेव्हा 'पूर्वी इथे मिलेट उत्पादन होत असे' असं शेतकरी म्हणतात.


मिलेट कशासाठी?


अन्न सुरक्षा : आपल्या देशातील वाढती लोकसंख्या आणि त्याप्रमाणे वाढत जाणारी अन्नधान्याची मागणी शिवाय वातावरणातील बदल यामुळे शेतीतील उत्पादन हळूहळू कमी होत आहे. परंतु मिलेट कोणत्याही प्रकारचा कस नसलेल्या, कमी पाण्याच्या जमिनीत शिवाय खडकाळ जमीनतही उगवून येते. शिवाय इतर पिकांच्या तुलनेत जास्त उत्पादन देते त्यामुळे आपल्या देशाच्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागवण्यासाठी मिलेट हा उत्तम पर्याय आहे.


पोषण सुरक्षा : आपण सगळेच जाणतो की आता बाजारात मिळत असणार्‍या अन्नधान्यामध्ये पोषणमूल्यांचे प्रमाण अतिशय कमी आहे. परंतु मिलेटचे पोषणमूल्य पाहता इतर धान्याच्या तुलनेत प्रोटीन, कॅल्शियम, फायबर जास्त प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे आपल्या देशातील कुपोषणाची समस्या सोडवण्यात मिलेट्सची मदत होईल.


आरोग्य सुरक्षा : अन्न हेच ब्रह्म हे आपली हिंदू संस्कृती शिकवते. आणि त्याचमुळे मिलेटमध्ये असणाऱ्या सगळ्या पोषणमूल्यंमुळे आपले आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी मदत होते. दक्षिण भारतात काम करणारे डॉक्टर खादर वली यांनी अनेक रुग्ण मिलेटच्या आहाराद्वारे निरोगी केले आहेत.


निसर्ग संवर्धन व संरक्षण : आपण जाणतोच, की हवामानातील बदल आणि शेतीत वापरली जाणारी घातक रसायने यामुळे हवा, पाणी, अन्न दूषित होत आहे. परंतु मिलेटच्या शेतीमध्ये कोणत्याही प्रकारची रसायनं न वापरल्याने तसेच पाण्याची कमी गरज असल्याने निसर्गाला कोणतीही हानी होत नाही. शिवाय निसर्गाची सुंदरता वाढण्यास मदतच होते. त्यामुळे निसर्ग संरक्षण आणि संवर्धनासाठी मिलेट हा एक उत्तम पर्याय आहे.


शेतकरी उपजीविका : पाऊस कमी झाला किंवा मोठाली वादळे आली तरीही अशा जमिनीमध्ये टिकून असणारे मिलेट शेतकऱ्याला हुकमी उत्पादन मिळवून देते. शिवाय वाढती जागरूकता आणि ग्राहकांची मागणी यामुळे शेतकऱ्याला त्याच्या मालाला  योग्य तो दर मिळतो. त्यामुळे शेतकऱ्याच्या उपजीविकेची भरण होते. मुळात लागणार उत्पादन खर्च हा खूप कमी असल्याने राहणारी शिल्लक ही शेतकऱ्याला परवडणारे असते. 


जनावरांच्या चाऱ्याची सुरक्षा : कोणत्याही मिलेटमध्ये कणीस वगळता इतर भाग हा जनावरांच्या खाण्यासाठी वापरला जातो, शिवाय चारा हा सकस व उत्तम दर्जाचा असतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था उपलब्ध होते.


पोषणमूल्य : 


खाली दिलेल्या तक्त्यामध्ये आपल्याला ते व्यवस्थितरित्या पाहता येईल.




कमी ग्लायसेमिक इंडेक्स : कोणत्याही मधुमेह झालेल्या व्यक्तीला ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेली धान्य खाण्यास सांगितले जाते त्यामागचं कारण असं, की ग्लायसेमिक इंडेक्‍स कमी असलेले धान्य आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज हळूहळू सोडतं म्हणजेच एखादं धान्य खाल्ल्यानंतर आपल्या शरीरात हळूहळू ऊर्जा सोडली जाते. त्यामुळे आपल्या शरीराला मिळणारी ऊर्जा दिवसभर टिकते व शरीरात साखरेची पातळी योग्य राखली जाते.


ज्वारी - महाराष्ट्रासारख्या राकट देशात आणि सह्याद्रीने नटलेल्या या भूखंडावर सगळीकडेच बेसाल्ट दगड मोठ्या प्रमाणात आढळतात. ह्या अशा भल्यामोठ्या दगड असलेल्या जमिनीला वेधून देखील ही ज्वारी उगवते ती दगडी ज्वारी. मुलींचे केस विस्कटल्यावर जसे दिसेल तशी एक ज्वारी महाराष्ट्रात होते ती झिपरी ज्वारी. पिवळी, मालदांडी, बेंद्री असे देशी ज्वारीचे विविध प्रकार महाराष्ट्रात होतात. पचायला हलकी, शरीराला ऊर्जा देणारी, गुणकारी ज्वारीची भाकरी आपण खाल्ली असेलच.


नाचणी : नाचणीचे कणीस मुठी बंद केलेल्या हातासारखे दिसते. म्हणून ते इंग्रजीत फिंगर मिलेट. कॅल्शियमयुक्त नाचणी सत्त्व सहा महिन्याच्या बाळाला आवर्जून खायला देतात. नाचणी रंगात पांढरी, लाल, फिकट लाल असते. आयुर्वेदात नाचणी थंड आहे असे सांगितले आहे. म्हणूनच उन्हाळ्यात अनेक शेतकरी फक्त नाचणीचे आंबील खाऊन दिवसभर काम करतात.


बाजरी : मोत्यासारखी दिसणारी उंच उंच कणीस असणारी देवठाण ही बाजरीची देशी जात. मोत्यासारख्या बाजरीला म्हणूनच इंग्रजीत पर्ल मिलेट म्हणतात. हिवाळा सुरू झाला की घराघरात बाजरीची भाकरी बनायला सुरुवात होते. स्वभावाने उष्ण, चवीला गोडसर बाजरी पक्षांचे देखील आवडते खाद्य आहे. महाराष्ट्रात नगर, साताऱ्यातील काही भाग, सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात बाजरी उत्पादन होते.


कोदो / हरिक (कोकणी) / कोडो मिलेट - हिंदीमध्ये असणारा कोदो या शब्दावरून त्याला इंग्रजीत कोडो म्हणतात. दिसायला काळपट तपकिरी रंगाचे असते. ह्याला हिमालय मिलेट देखील म्हणतात. उत्तराखंडमध्ये व उडीसामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. साधारण १२० दिवसांमध्ये हे मिलेट येते. कोडो मिलेट शेतीला येणारा वास उग्र असतो, त्यामुळे शेतामध्ये नॅचरल फेन्सिंग म्हणून देखील हे वापरता येते. रक्त शुद्धीकरणासाठी तसेच आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन आणि डब्ल्यूबीसी सशक्त करण्यासाठी कोडो मिलेट खावे. डेंग्यू तसेच मलेरियाच्या काळात कोडो मिलेट दिल्यास चांगला परिणाम जाणवतो.


फॉक्सटेल मिलेट / राळ / कांग - फॉक्सटेल मिलेटचे कणीस हे कोल्ह्याच्या झुपकेदार शेपटीसारखे दिसते म्हणून त्याला फॉक्स्टेल म्हणजेच कोल्ह्याची शेपटी असे म्हणतात. रंगाने पिवळा आणि बारिक दाण्याचे असते. यामध्ये देखिल रंगाचे विविध प्रकार आहेत. ९० दिवसांमध्ये हे मिलेट येते. याला इटालियन मिलेट देखील म्हणतात. आल्पसमधील डॊंगराळ प्रदेशांमध्ये हे मिलेट येतं. भगवान विष्णूचे तिसरे अवतार वराहास्वामी हे एकदा राक्षसांशी युद्ध करत होते. तेव्हा राक्षसांशी युद्ध करून त्यांना दम लागला, थकवा जाणवला. त्यांच्या भक्तांनी त्यांना काय हवं असं विचारलं तर त्यांनी फॉक्सटेल मिलेट हवे असं सांगितले. म्हणजेच आपल्या फुप्फुसांच्या संदर्भात असणाऱ्या अनेक समस्यांवर हे उत्तम. आपल्या शरीरातील सिरोटोनिन नावाचे संप्रेरक शरीरात तयार करण्यास फॉक्सटेल मिलेट मदत करते ज्यामुळे आपले मन प्रसन्न राहते. काही मानसिक समस्यांसाठी देखील हे मिलेट खाल्ले जाते.


लिटल मिलेट / वरई / भगर  - नावाप्रमाणेच लिटल म्हणजेच लहान आकाराचे दाणे असणारे हे मिलेट आहे. रंगाने थोडे सफेद असते. १२० दिवसांमध्ये येणाऱ्या या लिटल मिलेटला आफ्रिकन मिलेट असे देखील म्हणतात. प्रजनन संस्थेबद्दल असलेल्या अनेक समस्यांसाठी तसेच मासिक पाळीमधील समस्यांसाठी हे मिलेट खाल्ले जाते. याला व्रताचे तांदूळ असेदेखील म्हणतात. शरीरावर झालेली जखम लवकर बरी होण्यासाठी तसेच जे जोडपं लहान मुलांसाठी प्रयत्न करत आहेत त्यांनी एक वर्षअगोदर आणि मूल झाल्यानंतर एक वर्ष मिलेट खाल्ल्यास उत्तम.


ब्राऊनटॉप मिलेट / हरी कांगनी  - हे मिलेट हिरव्या रंगाचे असून, त्या मिलेटचा टॉप हा ब्राऊन रंगाचा असतो, म्हणूनच याला ब्राऊन टॉप असणारे मिलेट असे म्हणतात. साधारण ७० ते ७५ दिवसांमध्ये हे पीक घेता येते हे पीक सशक्त असल्याने अगदी कुठल्याही जमिनीमध्ये उगवते. मोठ्या झाडाखाली सावली असताना देखील हे व्यवस्थित उगवते. सगळ्यात जास्त तंतूयम घटक त्यामुळे आपल्या जठरानिगडित असणाऱ्या अनेक समस्याबद्दल तसेच पचनसंस्थेच्या समस्यांबद्दल, त्वचेशी निगडित असणाऱ्या समस्या, विस्मरणाच्या समस्याबद्दल देखील हे मिलेट खाल्ले जाते. कोणत्याही मिलेटमध्ये मैदायुक्त पदार्थ नसल्याने वजन कमी करण्यासाठी मिलेट उत्तम. त्यात ब्राऊन टॉप सगळयात उत्तम.


बार्नयार्ड मिलेट / सावा - रंगाने थोडेसे त्वचेच्या रंगाचे व दिसायला काळपट असे हे मिलेट आहे. सहसा आपला बार्नयार्ड मिलेट आणि लिटल मिलेट यात गोंधळ उडतो परंतु दोन्ही मिलेट बाजूला ठेवल्यास पटकन फरक लक्षात येतो. साधारण ९० दिवसांमध्ये येते. याला जापनीज मिलेट असे म्हणतात. पक्ष्यांचे आवडीचे असल्याने तुमच्या जमिनीची आणि मातीची सुधारणा करायची असल्यास हे मिलेट जरूर लावावे. आपल्या शरीरात असणारे नाजूक अवयव जसे की, किडनी, यकृत, स्वादुपिंड यांच्या स्वच्छतेसाठी हे मिलेट खाल्ले जाते. ज्या लहान मुलांना भूक लागत नाही त्यांना हे दिल्यास उत्तम फरक जाणवतो. भूक लागते. याचे अनेक गोड पदार्थ केले जातात.


प्रोसो मिलेट / चेनी / मोठी वरई  : आकाराने टपोरा दाण्यांचे व पिवळसर रंगाची असे मिलेट दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात होते. या मिलेटमध्ये प्रोटीनचे प्रमाण इतर मिलेटच्या तुलनेत जास्त असते. महाराष्ट्रात मिळणारी नाशिक वरई ती हीच.


कोणता मिलेट कशासाठी खायचं? किंवा ते का खायचं, असा प्रश्न सारखा सतावत असतो म्हणूनच हा एक तक्ता बनवला आहे ज्यात तुम्ही प्रत्येक मिलेटला कोणत्या समस्येवर खाल्ला जातो हे पाहू शकता.

मिलेट वापरताना लक्षात ठेवायच्या चार गोष्टी आहेत.

१. कोणताही मिलेट वापरताना ते पहिल्यांदा स्वच्छ धुऊन नंतर आठ तास भिजवून, त्याचा कुठलाही पदार्थ करावा.

२. मिलेट धुताना जर रंग गेला तर ती नैसर्गिक क्रिया आहे त्यामुळे दोन वेळा पेक्षा जास्त मिलेट धुवू नये.

३. मिलेट खरेदी करताना unpolished मिलेटच खरेदी करावे म्हणजेच मिलेटला रंग असतो पूर्णपणे सफेद असलेले मिलेट विकत घेऊ नये.

४. शहरांमध्ये हल्ली मिलेट म्हणून बरेच जण मिलेटच्या बिया म्हणजेच सिड विकत आहेत त्यामुळे घेताना काळजी घ्यावी.

५. कोणतेही मिलेट एकत्र करून खाऊ नये.





मिलेटचे असंख्य पदार्थ करता येतात. तुमच्या जेवणात तांदुळाचे जितके पदार्थ बनवले जातात तितके सगळे पदार्थ मिलेटचे बनवता येतात.

प्रामुख्याने मिलेटचा भात केला जातो. इडली, डोसा, उपमा ,खीर असे विविध पदार्थ, शिवाय आता बाजारात मिळणारे नुडल्स , शेवया, बिस्कीटे, लाडू, मुरमुरे असे असंख्य पदार्थ यापासून होतात.


म्हणूनच सगळ्यांनी आहारात मिलेटचा जरूर समावेश करा.कारण मिलेट हे शेत, शेतकरी,ग्राहक, पृथ्वीसाठी सगळ्यात उत्तम आहे.



(मडके फोटो : बाळु घोडे) 

संतोष बोबडे.

7900084125

santoshbobade60@gmail.com


Comments