निसर्ग संवर्धनाच्या डोळस वाटा
या शतकात माणसाची प्रगती होत असतानाच पर्यावरणाचे प्रश्न गंभीर रूप धारण करायला लागले आहेत. कमी होत चाललेले जंगल आच्छादन, नष्ट होत चाललेली जैवविविधता, जल - जमीन - वायू प्रदुषण, वातावरणातील बदल अशी प्रश्नांची यादी मोठी आहे. प्रश्नांचे स्वरूप गंभीर बनत चालले तसे त्यावर मात करण्याची धडपड देखील सुरू झाली. पर्यावरणीय समस्या सोडवल्या नाहीत तर मानवी अस्तित्व देखील धोक्यात येऊ शकते याची जाणीव झाल्यानंतर निसर्ग संवर्धनाच्या प्रयत्नांना गती आली. उपायांची यादी मोठी आहे. त्यापैकी वृक्षलागवड हा उपाय मोठ्या प्रमाणात अंमलात आणला जातो. भारतातील फार मोठे क्षेत्र वनखात्याच्या मालकीचे आहे. त्यामुळे सरकारी पातळीवर वृक्षलागवड करण्यासाठी वनखाते अग्रेसर आहे. पण...
वनस्पती लागवड करताना वनखात्याच्या सामाजिक वनीकरण विभागाने प्रचंड भूभागावर विदेशी वनस्पतींची लागवड केली. पटकन व कुठेही वाढतात या दोन कारणांसाठी सुबाभूळ, ग्लिरीसिडीया, सुरू, वेडी बाभूळ या वनस्पतींची वारेमाप लागवड केली. याच काळात टणटणी, रानमारी, कॉसमॉस आदी विदेशी तणांनी अनेक अधिवासांवर आक्रमण केले. विदेशी वनस्पतींना शत्रू नसल्याने त्यांच्यापैकी अनेक प्रजाती रूजण्याचे प्रमाण प्रचंड वाढते. त्यामुळे त्या प्रजातींचा विस्तार जास्त होतो. यातून वृक्ष आच्छादन वाढले तरी जैवविविधतेला त्याचा फायदा होत नाही. बरेचसे स्थानिक कीटक - पक्षी - प्राणी विदेशी वनस्पतींपासून अन्न मिळवू शकत नाहीत.
सकारात्मक बाब म्हणजे हल्ली पर्यावरण प्रश्नांबाबत समाजात जागृती वाढते आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी काम करणाऱ्या लोकांची संख्या वाढते आहे. पण मला वाटते की याच टप्प्यावर आता निसर्गासाठी काम करणाऱ्यांनी थोडे थांबून स्वतःची विचार प्रक्रिया तपासून बघायला हवी. आपण जे काम निसर्ग वाचवण्यासाठी म्हणून करतो आहोत ते खरेच निसर्ग संवर्धनासाठी उपयुक्त आहे की काही काळानंतर निसर्ग विघातक कृती ठरणार आहे याची शास्त्रीय पातळीवर कठोरपणे चिकित्सा करायला हवी. मधल्या काळात अनेक संस्था तसेच वनस्पतीतज्ज्ञ यांनी केलेल्या जनजागृतीचा प्रभाव पडून देशी वनस्पती लागवड करण्याकडे कल वाढतो आहे.
सुरवातीला देशी वनस्पती लागवड करायची ठरवल्यावर पहिली अडचण येते असे ती म्हणजे देशी वनस्पतींचे रोप मिळवण्याची. अनेक रोपवाटिकांमधे विदेशी तसेच बागांमधे लावण्यास उपयुक्त वनस्पतींची रोपे मिळतात. रोपवाटिकेत रोप वाढवण्यासाठी देशी वनस्पतींच्या बिया मिळायला हव्यात. यातूनच बीज संकलनाच्या उपक्रमाला सुरवात झाली. यासाठी अनेक लोक कष्ट करत आहेत. ते कष्ट चुकीच्या कामासाठी खर्च होऊ नयेत म्हणून काळजी घ्यावी अशी विनंती. लोकांनी बिया गोळा करायला जाण्याआधी खालील गोष्टींची खात्री करून घ्यावी .
१) बीज संकलन उपक्रमात सोबत वनस्पती किंवा रोपवाटिका या विषयातील तज्ज्ञ व्यक्ती आहे का? ती तज्ज्ञ व्यक्ती वनस्पतीचे फळ पक्व झाले आहे की नाही हे सांगेल. याने वनस्पतीवरील सरसकट सर्व फळ तोडली जाणार नाहीत व वाया जाणार नाहीत. फळ पक्व नसेल तर त्यापासून उगवण होणे अशक्य असते. झाडांवरील सर्व फळे एकाचवेळी पक्व होत नाहीत. थोडया थोड्या दिवसांनी थोडी थोडी फळ पक्व होतात. त्याचे एक चक्र असते. त्यामुळे एकावेळी झाडावरील फळे काढली तर अनेक बिया न रूजता वाया जातात.
२) फळ लागलेल्या झाडावरील शब्दशः झोडपून सर्व बिया आपण गोळा करत नाही याची काळजी घ्या. हे मनात पक्के लक्षात ठेवले पाहिजे की निसर्गात तयार होणाऱ्या प्रत्येक बीपासून नवीन वनस्पती तयार होत नाही. तसेच फळ हे अनेक प्रकारचे पक्षी, वटवाघळे व मुंग्याचे खाद्य आहे. वनस्पतींच्या नैसर्गिक बीज प्रसारासाठी ते आवश्यक आहे. आपण वनस्पतीवरील सर्व फळ तोडली तर वन्यजीवांना खाद्य कुठले मिळणार? त्यामुळे हे लक्षात घेऊया, की बीज संकलनामुळे अनेक वन्यजीवांचे अन्न हिसकावून घेतले जाऊ नये.
३) याशिवाय अनेक बिया जमिनीवर पडतात. त्या न रूजता तेथेच कुजून जातात व त्यांची माती बनते. जेव्हा सर्व बिया गोळा केल्या जातात तेव्हा चांगली माती बनण्याची प्रक्रियेत एक अडथळा निर्माण होतो.
बीज संकलनाचे जे उपक्रम सुरू आहेत त्यातील अनेक उपक्रमात या माहितीची कमतरता असल्याचे जाणवत आहे.
पुण्याच्या टेकड्यांवरचे हे उदाहरण आहे . साधारण ३० वर्षांपूर्वी पुणे परिसरातील टेकड्या उजाड झाल्या असल्याने त्यावर वनीकरण करण्याचे वनखात्याने ठरवले. त्यावेळेस टेकड्या उघड्या बोडक्या असल्याने जमीन तापत होती व पावसाळ्यात वाहून गेल्याने मातीचा थर कमी होता. या वातावरणात देशी झाडे टिकणार नाहीत व जी टिकतील ती वाढायला वेळ लागेल म्हणून वनखात्याने ग्लिरिसिडीयासारख्या विदेशी वनस्पतींची लागवड करायचे ठरवले. या वनस्पती विपरीत वातावरणात तग धरतील शिवाय त्या लवकर वाढतात हे गुण बघितले. या वनस्पतींची मुळे जमीनीत नायट्रोजन पकडून ठेवतात हा जादाचा गुण होता. पाच वर्षे या विदेशी वनस्पती वाढवून जमिनीवर हिरवे आच्छादन, माती व आर्द्रता वाढवायचे व त्यानंतर हळूहळू या वनस्पती उपटून तेथे देशी वनस्पती लागवड करायची असा प्लॅन होता. दुर्दैवाने हा प्लॅन कागदावरच राहिला व मागील ३० वर्षात पुण्याच्या टेकड्यांवर विदेशी वनस्पतींचे जंगल तयार झाले. ही मोठी चूक होती हे सगळ्यांना कळायला मोठा कालावधी लोटावा लागला. तरीही आता या टेकड्यांची वाट लावायची असे ठरवून वनखात्याने विदेशी वनस्पतींची लागवड केली असे आपण म्हणू शकत नाही. शास्त्रीय ज्ञान न घेता केलेला उद्योग असे म्हणता येईल. असेच काहीसे अनेक बीज संकलन मोहिमांबाबत म्हणता येईल. तसेच परत एकदा ही नैसर्गिक घटना न राहता निसर्गचक्रात केलेला मानवी हस्तक्षेप होतो आहे.
सर्व कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती की बीज संकलन मोहिमा अंमलात आणताना तेथील वन्यजीवांचा देखील विचार करा. मोजक्या बिया गोळा करा. खरे तर आपापल्या परीसरात एक जागा शोधून काढावी. तेथे पूर्ण वाढलेल्या स्थानिक देशी वनस्पतींच्या बीजांपासून बनवलेल्या रोपांची लागवड व जोपासना करायला हवी. काही वर्षांनी त्या वनस्पतींच्या बिया मिळायला सुरुवात होईल. या वनस्पती मातृवनस्पती म्हणून उपयोगी पडतील.
- राजीव पंडित
अध्यक्ष - जीविधा
९४२१० १९३१३
Comments
Post a Comment