नदी रहावी नदीसारखी

तीस एक वर्षंतरी मी पुण्यात राहत असेन. पण नदी म्हटल्यावर मला अजूनही पहिल्याने आठवते ती लहानपणीची तापी. तिच्या काठावर कित्येक वेळा फिरायला गेलोय, दगड वेचलेत, कुर्डूचे कोंबडे गोळा केलेत, पोहणं तिथेच शिकलेय. गण्पती विसर्जन तिथेच, आणि संध्याकाळी फिरायलाही तिच्या काठच्या देवळापर्यंतच. शाळेची सहल तिथेच, आणि घरच्या बागेसाठी वाळू आणायलाही तिथेच. हातनूरचं पाणी सोडलं म्हणजे बंधार्‍यावरून पाणी वहायला लागायचं. मग नदीच्या पाण्याला वास यायचा नाही, पोहायला जाता यायचं. शेवाळालेल्या बंधार्‍यावरून नदीच्या मध्याच्याही पलिकडे कमी गर्दीमध्ये पोहायला जायचं. काबरा काका तर बंधार्‍यावरून त्यांची सायकलही सोबत घ्यायचे पोहायच्या जागेपर्यंत. तिथेच मग पंचांचे आडोसे करून कपडेसुद्धा बदलायचो आम्ही. पण या सगळ्याच्याही आधी, अगदी लहान असताना एका सुट्टीच्या दिवशी सकाळी सोनेरी उन्हात बाबा आणि मी दोघंच नदीवर फिरायला गेल्याची कोडॅक आठवण तर कायमचीच मनावर कोरली गेलीय. ते गाव सुटल्यावर पुन्हा कधीच तिथे गेले नाही आजवर. पण अजूनही रेल्वेने उत्तरेकडे जायची वेळ आली, तर तापी बघायला रेल्वे डब्याच्या दारात उभं रहायचं चुकत नाही. आणि माझी नदी म्हटलं की तीच आठवते.

पुण्यात इतकी वर्षं राहूनही दुर्दैवाने मुळा – मुठेशी असं नातं कधीच जोडलं गेलं नाही. एक तर घर सहज नदीपर्यंत चालत जावं अशा अंतरावर नव्हतं. त्यात त्या काळापासूनच मुळा मुठेची गटारगंगा झाल्याचं ऐकत होते. पर्वती, वेताळ टेकडी, तळजाई अशी पुण्यातल्या टेकड्यांची ओळख झाली, घराजवळची टेकडी ही तर नेहेमीच्या जाण्यातली जागा झाली, पण नदी मात्र दूरचीच राहिली. नदी म्हणजे नुसतं उगमापासून समुद्रापर्यंत वाहणारं पाणी नसतं. ही काय जादू आहे ते प्रथम उमगलं इकॉलॉजिकल सोसायटीचा कोर्स करताना, परिणिताने लिहिलेलं वाचताना. 

उगमापाशी बोटभर असणारी नदीची धार वाटेत तिला भेटणार्‍या असंख्य प्रवाहांनी मोठी होत समृद्ध होत जात असते. तशीच आजुबाजूच्या प्रदेशातलं भूजल वाढवतही असते, विहिरींना पाणी देत असते. उगमापाशीची अवखळ नदी, पुढे वळणं घेत घेत मोठी होत जाते, वाटेत किती डोह, धबधबे, प्रवाह लागतात. शेवटी समुद्राला भेटेपर्यंत ती विस्तीर्ण पात्र घेऊन शांत होत जाते. या सगळ्या तिच्या अयुष्याच्या प्रवासात ती नेहेमीच जीवनदायिनीच असते. वेगवेगळे अधिवास पुरवणारी, पाणी पुरवणारी. या नैसर्गिक रूपामध्ये नदीचं पाणी नेहेमी शुद्ध राहू शकतं. तिच्यामध्ये असणारे मासे, पाणनिवळ्या असे वेगवेगळे जीव तिला शुद्ध ठेवतात. 

पूर म्हणजे नदीचं बेशिस्त वागणं, ताल सोडणं. नदीवर, पूरावर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं, नाही तर हाहाःकार उडतो हेच मी नेहेमी ऐकलं होतं. पण पूर येणं हा निसर्गचक्राचा अविभाज्य भाग आहे. पूर आल्याने नदीकाठच्या परिसरात सुपीक गाळ पसरतो, जमिनीचा कस सुधारतो. सह्याद्रीतल्या, मोसमी हवामानाच्या आपल्या प्रदेशातल्या नद्यांना पूर आलेच पाहिजेत. त्यात चुकीचं काही नाही, माणसाने पूररेषेच्या आत वस्ती करणं चुकीचं आहे. नदीवर धरण बांधताना आपण तिच्या पुढच्या प्रवासातल्या शेजार्‍यांवर अन्याय करत असतो, त्यांचं पाणी हिरावत असतो. मराठवाडा कायमचा दुष्काळी का आहे? तिथे पाऊस कायम इतपतच होता, पण गोदावरी भरलेली होती, त्यामुळे ओढे – विहिरींना पाणी होतं. जागोजागी धरणं झाली – महाराष्ट्रात आता नवं धरण बांधायला जागाच नाही अशी स्थिती आहे – आणि मराठवाड्याची परवड सुरू झाली. 

नदी समजत गेली तसतशी आपल्या शहरातूनही नदी वाहते, तिची आपली ओळख नाही हे जास्त जाणवायला लागलं. शहरात आपण नदीला जागाच देऊ इच्छित नाही. आपल्यासाठी ती केवळ आपलं सांडपाणी वाहून नेणारी व्यवस्था आहे. कसं नातं तयार होईल शहरवासियांचं त्यांच्या नदीशी? कोर्स झाल्यावर ’जीवितनदी’ संस्थेने दत्तक घेतलेला रामनदी – मुळा संगमाचा परिसर बघायची संधी मिळाली, आणि प्रेमातच पडले मी त्या जागेच्या. गेल्या महिन्यात संगमवाडीला, नाईक बेटाजवळचा नदीचा किनारा बघितला. हा भाग पूर्वी लष्कराच्या हद्दीत होता त्यामुळे इथे नदीचा riperine zone – नदीकाठचा विशिष्ट वनस्पती आणि अधिवास असणारा, पूरामध्ये पाण्याखाली जाऊ शकणारा, पुराचं पाणी मुरवणारा, जमिनीवरून वाहत येणारं पाणी नदीत जाण्यापूर्वी ते गाळून शुद्ध करणारा पट्टा - अर्धनैसर्गिक अवस्थेत टिकून राहिला आहे. इथली झाडी साफ करून 'नदी सुधार योजने'च्या नावाखाली साबरमती रिव्हरफ्रंटची पुण्यातली आवृत्ती बनवण्याची योजना आहे. या झाडांच्या कत्तलीपूर्वी आपण काय गमावणार आहोत ते तरी बघावं म्हणून तिथल्या ट्रीवॉकला गेले होते. शंभर शंभर वर्षं जुनी बाभळीची झाडं, खैर, करंज, आंबा, चिंच, शंभर वर्षं जुनी शिंदीची झाडं, गुळवेल आणि पिळूकीचे महावेल. यातच प्रचंड वाढलेले पर्जन्यवृक्ष, विलायती चिंच, ऑस्ट्रेलियन बाभूळ. ९०% तरी कॅनोपी होती इथे. पायाखाली मऊशार, भरपूर ह्युमस असणारी माती. दोन ओढेही एवढ्या भागात नदीला मिळत आहेत. (त्यांचे मार्गही बुजणार आहेत.:(  ) 

कुठल्या बिंदूपर्यंत शहराचा र्‍हास झाल्यावर आपण हे शहर जगायच्या लायकीचं उरलं नाही म्हणून सोडणार असा प्रश्न पडतो मला. आणि शहराच्या नागरिकांना आपलं मत मांडताना रस्त्यावर यायची वेळ का यावी हाही. जमीन दिसली की कॉंक्रीट ओतायची माणसाला इतकी घाई का होते? हा ’नदी सुधार’ थोपवणं अवघड आहे. मोठी मोठी नावं यात गुंतलेली आहेत. योजनेला विरोध करणारे मोजकेच आहेत. ही संख्या वाढायला हवीय, त्यांचा आवाज दूरपर्यंत पोहोचायला हवाय. पोहोचेल ना? आपल्याला शक्य आहे तेवढे प्रयत्न नक्की करू या यासाठी. आपल्या नदीचा आवाज बनू या आपण. नदीचं नदीपण जपलं जावं, तिच्या काठवरची नाहक वृक्षतोड आणि कॉंक्रीटीकरण टाळलं जावं ही पुणेकरांची इच्छा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठीच्या आंदोलनात सहभागी होऊ या. 

- गौरी बर्गी

gouri.bargi@gmail.com

या आंदोलनाची वेबसाईट: http://www.puneriverrevival.com


Comments