'गोदावरी’बद्दल
‘गोदावरी’ चित्रपट पाहिल्यावर काही क्षण तरी ‘लेडी ऑफ द लेक’ (मणिपूरच्या लोकटाक तळ्यावर आधारलेला) आणि ‘जैत रे जैत’ या चित्रपटांची आठवण झाली. एखादी नैसर्गिक परिसंस्था (अनुक्रमे नदी / तळे / डोंगराळ वन) तिच्याजवळ राहणाऱ्या स्थानिकांचं आयुष्य, मनोव्यापार व्यापूनही उरून राहते ती कशी, ते या तिन्ही चित्रपटात दिसतं. तिची सुंदर - शांत आणि रौद्र अशी दोन्ही रूपे या समाजांना अनुभवायला मिळतात. या तिन्ही चित्रपटांमध्ये तीन वेगवेगळ्या समाजांच्या आयुष्याच्या रहाटगाडग्याचे मनोज्ञ दर्शन होते. साम्य आहे ते इतकेच.
फरक हा आहे, की इतर दोन्ही चित्रपटात निसर्गाजवळ राहणारे समाज थोडेफार ‘आदिम’ म्हणता येईल असे आहेत. ते दैनंदिन जीवन व संसाधने याबाबतीत स्थानिक निसर्गावर थेट अवलंबून आहेत. त्यांच्या परंपरांमध्ये निसर्ग आहे, भुतेखेते आहेत.
‘गोदावरी’ मात्र या बाबतीत वेगळा ठरतो. सुस्थापित अशा कृषीप्रधान, नागर संस्कृतीत धर्म, कर्मकांड यांना महत्त्व येऊ लागते, धार्मिक स्थळे नदीभोवती वसतात, वाढत जातात, तिच्या काठी अनेक धार्मिक संस्कार व विधी होतात. या सर्व सेवा पुरविणारी एक घट्ट सामाजिक वीण त्या स्थळी तयार होते. एक वेगळेच रहाटगाडगे सुरू होते. परंपरेने येथे राहणाऱ्या सर्व लोकांना या जीवनपद्धतीशी जुळवून घ्यावे लागते. अनेक दशके-शतके असेच रहाटगाडगे सुरू राहिल्यावर काहींना ते बाहेरच्या, झपाट्याने बदलणाऱ्या समाजाच्या तुलनेत निरर्थक, भकास वाटू शकते.
हे साहजिक आहे. १००% मानवी आहे.
अर्थात एका दुसऱ्या दृष्टिकोनातून तेच जगणे सुंदर, आश्वासकही वाटू शकते. ‘गोदावरी’मध्ये या दोन्ही दृष्टिकोनातील संघर्ष छान टिपला आहे असे वाटते. हा चित्रपट अशा अनेक रहाटगाडग्यांबद्दल प्रातिनिधिक आहे, समाजासाठी एक आरसा आहे असेही आपण म्हणू शकतो.
Comments
Post a Comment