जनजाती समुहातील मुलांचं पर्यावरण शिक्षण
जून २००५ साली शिक्षण सेवक म्हणून मी माझ्याच ग्रामपंचायत हद्दीतील एका छोट्या गावात शिक्षण सेवक म्हणून रुजू झालो. हे गाव पुर्णपणे आदिवासी समाजाचं. शाळा एकशिक्षकी होती. मी आणि पंधरा सोळा मुलं इतकाच आमचा शाळेतील गोतावळा.
नवीनच नेमणूक झालेला मी गुरूजी. प्रत्येक वर्गात तीन चारच मुलं होती. शिकवायचं कसं फार अनुभव नव्हता. दोन वर्ष शिक्षणशास्त्र जे शिकलो होतो समजून घेतले होते फार अपुरे आहे जणावत होतं. तरीही काम तर करणं आहेच तसा काही पर्यायही नव्हता. सोबत कोणी समजून सांगणाराही नव्हता.
हळूहळू मी मुलांच्यात बसून कामाला सुरुवात केली.
तेव्हा माझ्या लक्षात आलं की, वर्गात एका जागी बसून शिकयला ही मुलं फारशी तयार नाहीत. मुलांच्या कलाने जात मी कधी मुलांना मैदानावर तर कधी शाळेच्या परिसरात घेऊन फिरायचो. फिरून आल्यावर आमच्या अभ्यासाच्या गप्पा व्हायच्या. गुरुजी वर्गाबाहेर फिरवतो याचा अंदाज घेऊन मुलं देखिल अधूनमधून त्यांच्या परिसरातील गंमती जमती मला दाखवायला घेऊन जायचा आग्रह धरायची आणि मग आमची सहल निघायची रानात.
सुरवातीला, जवळच एखाद्या टेकडीवर जा, नाहीतर एखाद्या माळावर फुललेला खुरासनी बघायला जा असा उद्योग सुरू झाला. मुलही चांगली रमायला लागली यात. काही ना काही निमित्ताने रानाशी इतकी घट्ट मैत्री असलेली ही मुलं मला कधी कधी वेडा ठरवायची. माझीच खिल्ली उडवायची. एखादं नवं झाड दाखवून 'हे झाड कोणतं?' झाडाच्या खोडावरच्या खुणा दाखवून 'हे काय आणि कोणी बरं केलं असेल?' समोरून उडत गेलेला एखादा पक्षी किंवा त्याचा नुसता आवाज आला की, 'ह्या पाखरू वळंख बरं?' असा प्रश्न विचारला की माझा उडालेला गोंधळ बघून मुलं भलतीच खुश व्हायची. जाम हसायला लागयची, की गुरुजी आहे तरी याला इतकं कळत कसं नाही.
मी मुलांना लिहायला वाचायला शिकवू पाहात होतो तर, ही मुलं मला रानातल्या गमती जमती शिकवत होती. डिंक जमवणे, सरपणासाठी लाकडं गोळा करणे, मासे पकडणे, रानमेवा खायला जाणे या वेगवेगळ्या निमित्ताने रानातल्या अनुभवाने समृद्ध असलेल्या या मुलांनी माझी टिंगल उडविली तर नवल ते काय होतं? मी काय सांगणार होतो यांना मला लहानपणी तुमच्यासारखं रानात हिंडायला, परिसर समजून घ्यायला कोणी संधीच नाही दिली ती. घरातली मोठी माणसं पण आम्हाला फारशी कधी सोबत घेऊन शेतावर जात नव्हती म्हणून.
कधी कधी मोठ्या वर्गात लिहित्या वाचत्या मुलांच्या गटाला मी पाठ्यपुस्तकातला एखादा पाठ वाचून स्वाध्याय सोडवा असा अभ्यास द्यायचो. काही प्रश्न समजले नाही की मुलं माझ्या जवळ मदत मागायला यायची. ओलसर जागी धान्याची साठवणूक केली तर काय होईल? अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तर लिहिताना मुलं गोंधळात पडायची. ओलसर या शब्दामुळे हे घडलेलं आहे हे मला कळायचं. मी प्रश्न जरासा विस्कटून सांगितला की, मुलांचं उत्तर तय्यार - 'वल्या जाग्यावर ठेवला तर बुरी लागते.’ बुरी हा घरचा शब्द तर बुरशी पुस्तकातला.
बऱ्याचदा मुलांची परिसरातील भाषा आणि पुस्तकातली भाषा यात अंतर असतं. हे अंतर या मुलांना शिक्षणापासून कसं दुर नेतं हे कोडं मला उलगडत होतं. अशा या मुलांना समजत नाही असा घाईघाईत शिक्काही मारला जातो.
निसर्ग, पर्यावरण हे रोज जगणारी ही मुलं. शिक्षणात फारशी टिकत नाहीत. निसर्गाच्या सोबत राहून ही मुलं अनुभवसंपन्न बनलेली असतात. कोणते मासे कुठे सापडतात? कधी, कुठं कोणती फळं, रानभाज्या रानात मिळतात? कोणता पक्षी कुठे राहातो काय खातो? कधी त्याचा विणीचा हंगाम असतो? शेतात कोणत्या भागात काय चांगलं पिकतं? हे सारं माहिती असलेली ही मुलं कधी मागे पडतात हे लक्षातंही येत नाही.
प्रसंगी नदीच्या, ओढ्याच्या प्रवाहाचा अंदाज घेऊन प्रवाहाविरूद्ध पोहणारी ही मुलं गती, गतीचे नियम शिकणार नाही का ?
एकीकडे अनुभवसमृद्ध जीवन आणि दुसरीकडे पुस्तके शिकणे यांना जोडणारा दुवा म्हणून शिक्षकाला या मुलांचं नेमकं अडतं कुठे हे उमगण्याची गरज असते. मुलांना समजून घ्यायला थोडी उसंत हवी असते. वर्गात बसून परागीभवन हा पाठ शिकवण्यापेक्षा प्रत्यक्ष एखाद्या रस्त्याच्या बाजूला दिसणारी फुलं बघत बघत परागीभवन व ते घडण्यासाठीचे अवयव समजून घेण्यासाठी विविध फुलं सहज उपलब्ध होतील. कुंपणावरच्या वेलीची फुलं त्यावरील भुंगे, कीटक काय करत आहेत हे लक्षात येईल. गवतफुलं कशी असतात, पुंकेसर, कुक्षी यांची रचना शिकता येईल. कोणत्या रचनेत कोणतं माध्यम परागीभवन प्रभावी करेल यावर चर्चा किती सहजपणे होईल. मराठवाड्यात मका, कोकणात तांदूळ यांच्या फुलोऱ्यात फिरणाऱ्या मधमाशा बघता येतील. कीटक, पक्षी, वारा, पाणी इ. माध्यमे कधी, कोणत्या वनस्पतीमधे परागीभवन करतात याद्वारे निसर्गातील सहजीवन, परस्परावलंबन याचा संबध मुलं जाणतील.
प्राथमिक वर्गात नुसत्या अनुभवांवर भागतं, पण माध्यमिक व त्यापुढील वर्गात निभाव लागणं मुश्किल होऊन बसतं या पोरांचं.
ग्रामीण भागातील या मुलांचं पर्यावरणाविषयीचं प्रगल्भ ज्ञान मोजायची सोय नाहीये आपल्या परंपरागत शिक्षण व्यवस्थेत. किंबहुना त्यांच्या या अनुभवाचा आधार घेत ही मुलं इतर अनेक गोष्टी सहज शिकू शकतात अशी रचनाही करायची सोय नाही. मुलं ज्या परिसरात राहात असतात, वाढत असतात तो परिसर त्यांच्या पर्यावरण शिक्षणासाठी सक्षम माध्यम होऊ शकेल. उदाहरणादाखल शेतीचा विचार करता येईल. शेतीशी मुलं सहज जोडलेली असतातच. मुलांच्या या अनुभवाला आधार मानून अनेक विषय याभोवती गुंफता येईल, असं केल्याने शिक्षण प्रभावी व आनंददायी करता येईल, कदाचित नई तालीम शिक्षण विचार उपयोगी पडेल.
आपला आजूबाजूचा भवताल समजून घेता घेता समृद्ध शिक्षणाची मांडणी मुलांसाठी करायला हवी. आपल्या आजूबाजूला तयार झालेल्या भूरचना, त्यातील वैविध्य व या रचना निर्माण होण्यासाठी आवश्यक असलेली भौगोलिक घटकांची अनुकूलता याबद्दल कुतूहल निर्माण होईल असं भूविज्ञान सहज वर्गात आणता येईल. यासाठी मुलांचा भवताल जमेल तेव्हा वर्गातील चर्चाविश्वात यायला हवा आणि शक्य असेल तेव्हा मुलंही थेट भवतालात घेऊन जायला हवीत.
निसर्ग आणि पर्यावरण याचं शिक्षण ग्रामीण भागात करायचं म्हटलं की, शिक्षक म्हणून बराच वेगळा विचार करायची गरज आहे.
- किशोर काठोले , सहशिक्षक , जि. प. शाळा मोज, तालुका वाडा, जिल्हा पालघर.
मोबाईल ९३७०४ ३४९६५
परिसर अभ्यास हा विषय वर्गात चार भिंतींच्या आत शिकायचा नसून परिसरातच शिकायचा असतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे.
ReplyDelete