ओळख फुलपाखरांची
’फुलपाखरू’ हे नाव ऐकताच आपल्या समोर विविध रंगसंगती असलेले एका फुलावरून दुसऱ्या फुलावर उडणारे मध गोळा करणारे कीटक डोळ्यासमोर येतात. फुलपाखरू हा एक प्रकारचा कीटकच आहे. Lepidoptera या order मध्ये यांना समाविष्ट केले आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात साधारणपणे ३०० च्या जवळपास फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद झाली आहे. फुलपाखरांच्या रंगसंगती, शारीरिक हालचाली, अवयवांची ठेवण यामुळे फुलपाखरांचे ६ कुळात वर्गीकरण केले आहे.
1) Nymphalidae 2) Hesperiidae 3) Papilionidae 4) Riodinidae 5) Pieridae 6) Lycaenides
फुलपाखरांचा जीवनक्रम
फुलपाखरांचा जीवनक्रम प्रामुख्याने ४ भागांमध्ये असतो.
१) अंडी २) अळी ३) कोश ४) प्रौढ फुलपाखरू.
सुरवातीला फुलपाखराची मादी विविध झाडांना भेटी देऊन व ज्या पानांचा स्वाद आवडला त्या झाडाच्या पानावर अंडी घालते. फुलपाखरांच्या पायामधील असलेले सूक्ष्म receptor हे माणसाच्या जीभे सारखेच काम करते. पानांचा स्वाद चांगला की वाईट हे मेंदूपर्यंत पोहचवले जाते. ज्या झाडावर अंडी घातली जातात त्याला (host plant) असे म्हणतात.
कालांतराने अंड्यातून अळीरूपी फुलपाखरू बाहेर येते व अंड्याचे टरफल खाऊन मग पाने खायला सुरवात करते. खाऊन खाऊन भरपूर वाढ झालेली अळीची त्वचा डोक्यापासून फाटते (molting) व अळी त्यातून बाहेर येते व परत पाने खायला सुरवात करते.
तिसर्या अवस्थेत अळीरूपी फुलपाखरू स्वतःभोवती कोश तयार करते, व अनुकूल वातावरण लाभल्यास कोशातून पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू बाहेर येते.
फुलपाखरे (Butterflies) x पतंग (Moth)
फुलपाखरे |
पतंग |
१) फुलपाखरे ही दिवसा सक्रीय असतात |
पतंग हे रात्री सक्रीय असतात. |
२) फुलपाखरांचे पंख बसल्यावर उघडझाप करतात. |
पतंग बसताना पंख उघडे ठेवतात. |
३) स्पर्शिका सरळ, पुढील बाजू अर्धवर्तुळाकार असते |
पतंगाच्या स्पर्शिका या केसाळ, टोकदार असतात. |
४) फुलपाखरांचे रंग गडद असतात. |
पतंगाचे पंख अनाकर्षक असतात. |
फुलपाखरांचे अवयव व त्याची माहिती
१) स्पर्शिका (Antennae) – फुलपाखरे Antennae चा वापर हवेतील फुलांचा, संभाव्य जोडीदाराचा वास घेण्यासाठी करतात.
२) Thorax (धडाचा मधला भाग)– या अवयवावर फुलपाखरांचे पंख,पायाच्या जोड्या जोडलेल्या असतात त्यामुळे फुलपाखरांना उडण्याची ताकद मिळते.
3) डोके – डोक्यामध्ये मेंदू,डोळे,Antennea, proboscis या सारखे संवेदी अवयव असतात.
4) Abdomen – हा फुलपाखरांचे पुनरुत्पादन अवयव आहे.
5) सोंड किंवा तोंडाचा भाग (Proboscis) – फुलपाखराचे तोंड म्हणजे एक प्रकारची सोंड असते, ही वापरून त्यांना फुलांमधला रस पिता येतो.
6) पुढचे आणि मागचे पंख (Fore wings – hind wings) – पुढे – मागे उडण्यासाठी याचा उपयोग होतो.
7) पयांच्या ३ जोड्या – पायांचा वापर फुलांवर,पानांवर बसण्यासाठी व पानाची चव चाखायला होतो.
नैसर्गिक शिकारी आणि फुलपाखरांचा शत्रू
निसर्गात प्रत्येक प्राण्याची संख्या मर्यादेत ठेवायला दुसरा प्राणी असतोच, फुलपाखरे कितीही सुंदर असली तरी त्यांना इथे अपवाद नाही. विविध सरडे, पाली, पक्षी, कोळी, नाकतोडे यांचे फुलपाखरे हे अन्नच आहे. पण त्यांचा खरा शत्रू माणूसच म्हणावा लागले. माणसाने फुलपाखरांचा अधिवास असलेली विविध प्रकारची जंगले, माळरानातील झाडे – झुडुपे, फुलझाडे ही स्वतःच्या फायद्यासाठी तोडली व त्यामुळे फुलपाखरांची संख्या खालवत गेली.
फुलपाखरे, त्यांचे निसर्गातील महत्त्व व माणसाची भूमिका
फुलपाखरांना निसर्गातील दिशादर्शक (litmus test) असे म्हटले जाते. परीसंस्थेमध्ये होणार्या बदलांचा परिणाम आपल्याला फुलपाखरांच्या संख्येवर झालेला दिसतो. फुलपाखरांमुळे परागीकरण होण्यास मदत होते. ज्या भागात विविध फुलपाखरे असतात तिथले वातावरण शुद्ध असते. झाडांची कमतरता, प्रदूषित हवा, प्रदूषित पाणी असलेल्या भागात फुलपाखरे सहसा दिसत नाही.
फुलपाखरांना अभय द्यायचे असेल तर देशी झाडांची, फुलझाडांची लागवड, त्यांना आवडणारा चिखल असणार्या mud – puddling sites तयार करणे हे गरजेचे आहे. आपल्या घरातील अंगणात, बाल्कनीमध्ये तसेच बगिचांमध्ये, कार्यालयाच्या आवारात असे करता येऊ शकते. “फुलपाखरू उद्यान” तयार केल्यास ही उडणारी फुले आपल्याला बघता येतात व त्या अनुषंगाने त्यांचे संवर्धन होण्यास मदत होते.
- अनिरूद्ध बडे
aniruddhabade@gmail.com
Comments
Post a Comment