आधी केले मग सांगितले
पर्यावरणाबद्दल आपण बोलतो, वाचतो, मुद्दाम एखादा अभ्यासक्रम शिकतो. ऊहापोह करतो पण प्रत्यक्ष कृती करायला कचरतो. आम्ही २२ जानेवारी २०२३च्या रविवारी अशा एका अवलियाला भेटलो, की ज्याने औपचारिक शिक्षणाच्या फंदात न पडता धडाक्याने कामाला सुरुवात केली आणि साताठ वर्षं अविरत मेहनत करून एक नवीन जग निर्माण केलं. तो अवलिया म्हणजे प्रवीण भागवत.
इकॉलॉजिकल सोसायटीचा अभ्यासक्रम मी पूर्ण केला, वर्ष संपलं. तेव्हा प्रकाश गोळे सर नेहमी म्हणायचे की नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत पद्धतीने वापर करून, स्वयंपूर्ण आणि सुखी आयुष्य जगणार्या लोकांचे समूह निर्माण व्हायला हवेत. प्रवीण भागवतांच्या वेताळेच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाला भेट दिली तेव्हा मला प्रकर्षाने वाटलं की हे तर गोळे सरांच्या स्वप्नविश्वात टाकलेलं, रुजवलेलं पहिलं पाऊल आहे. ही सुरुवात आहे आणि पुढची शाश्वत स्वयंपूर्णतेकडे होणारी वाटचाल स्पष्ट दिसत आहे.
२०१३ साली २०० एकर जमिनीवर हा प्रकल्प सुरु झाला तेव्हा अर्थातच पहिलं आव्हान पाण्याचं होतं. ७५० मिमी पाऊस पडणार्या, एका कोरड्या ठणठणीत - केवळ पाणी वाहण्याच्या खुणा दाखवणार्या ओढ्याभोवतीच्या -परिसरात पाण्याशिवाय काय करणार? विहीर, मोठं टाकं खोदूनही पाण्याचा थेंबही दिसेना तेव्हा सामान्यज्ञान वापरून पाण्याच्या मार्गातच मोठा खड्डा खणून पावसाचं पाणी साठवायचा प्रयत्न मात्र आशेचे किरण घेऊन आला आणि तीन वर्षांनी तिथून पाणी झिरपत झिरपत विहिरीला पाणी आलं. पाण्याला त्याचा मार्ग सापडला आणि पर्यावरणीय पुनरुज्जीवनाला गती मिळाली.
वनस्पतींच्या नैसर्गिक उगवणीला हातभार म्हणून अनेक झाडं लावली. पाणी देऊन ती जगवली. आणि चार वर्षं जगवलेली, संगोपन केलेली झाडं आता स्वबळावर जगू लागली आहेत. उंचावरून पाहिलं की हा परिसर एखाद्या पाचूच्या खड्यासारखा उठून दिसतो.
संपूर्ण परिसरात ४४ टाकी खोदली आहेत, ज्यात पावसाचं पाणी साठतं आणि हळूहळू झिरपून जमिनीखालील पाण्याची पातळी वाढवतं. आजूबाजूच्या वस्त्यांमधील लोकांनाही अगदी जवळच पाणी मिळू लागल्यावर मात्र या प्रकल्पाबाबतीतला त्यांचा अलिप्तपणा, विरोध मावळला आणि आता तर गुरं पाळणारे, शेतकरी, राहाळातल्या ग्रामपंचायती आपणहून या कामात सहभागी होण्यासाठी येत आहेत, मदत करत आहेत, मदत मागत आहेत. त्यांच्या जमिनींवरही काम करण्याची विनंती करत आहेत. अशी ६५ - ७० गावे जर एकत्र आली तर स्वयंपूर्णतेचे शिखर का नाही गाठता येणार?
डोंगरांनी पाणी धरून ठेवावे म्हणून अत्यंत शिस्तबद्धरित्या वृक्षारोपण सातत्याने सुरू आहे. त्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रातून मदतीचे हात पुढे येत आहेत. काहीही झालं तरी या प्रकल्पाला पर्यटकांचं आकर्षण होऊ द्यायचं नाही आणि परिसराचा कार्बन फूट्प्रिंट वाढवायचा नाही हे प्रवीण भागवत आणि त्यांच्या “14 ट्रीज” या संघटनेने ठामपणे ठरवले आहे.
निसर्गाची ओढ आणि पुनरुज्जीवनाचा ध्यास या जोरावरच कधी चुकतमाकत पण योग्य दिशा पकडून हे काम चालले आहे त्याला तोडच नाही. भविष्यात हा परिसर इंधन आणि ऊर्जा याबाबतीतही स्वयंपूर्ण होणार याची खात्री पटावी अशा पद्धतीने कामे पुढे सरकत आहेत.
आत्ताच इथे १०० लोकांना रोज रोजगार मिळत आहे. कामे करणारी सगळी माणसे आजूबाजूच्या वस्त्यांवरची आदिवासी, भटक्या जमातीतली आहेत. बाहेरची नाहीत. आजवर पाण्याचा एकही टॅंकर मागवला नाही, जवळच्या चासकमान धरणातून पाणी उचलले नाही किंवा पाईपलाईनने पाणी आणले नाही. पाणी आणि अन्नधान्ये या बाबतीत स्वयंपूर्णता मिळवली आहे. जंगल उभे राहिले आहे. त्याचा विस्तार वाढत आहे.
निसर्गाला काही देऊ इच्छिणार्यांचे, काम करणार्यांचे इथे नेहमीच स्वागत आहे. प्रत्येक माणूस निसर्गातून घेत असलेल्या प्राणवायूची आणि प्रत्येक श्वासातून सोडलेल्या कार्बनडायॉक्साईडची किंमत जाणत असेल तरच निसर्गाच्या पुनरुज्जीवनाची निकड त्याच्या लक्षात येईल आणि तोच या पुनरुज्जीवन प्रकल्पात पाऊल टाकण्यास योग्य आहे अशी प्रवीण भागवतांची धारणा आहे. कारण त्यांनी आधी काम केले आणि मग सांगितले!!!
अनेक अभ्यासक आणि विविध क्षेत्रातील माणसे इथे येऊन हे काम पाहून सुखावतात. आपल्या कल्पनांची भर घालतात, आपापली कौशल्ये, श्रम देण्यासाठी उत्सुक असतात. प्रत्येकाला नक्कीच वाटतं की आपल्याच मनातला निसर्ग इथे साकारला आहे.
आता जरूर या प्रकल्पाचा शास्त्रीय अभ्यास व्हावा, काही सिद्धांत तयार व्हावेत. सिद्धांतांना अनुसरून काम करण्यापेक्षा काम करून सिद्धांत निर्माण करणं हे जास्त जिवंतपणाचं आणि उत्स्फूर्त आहे असं मला वाटतं.
- भारती केळकर.
kelkarbharati@gmail.com
Comments
Post a Comment