Testimonials of FES Volunteers: नीलम कर्ले २०२०-२१

 इकॉलॉजिकल सोसायटीच्या कोर्समध्ये पर्यावरणपूरक जीवनशैली आणि निसर्गसंवर्धनाची तत्त्वे शिकायला मिळाली. गेल्या वर्षी प्रवीण भागवत यांनी पुढाकार घेतलेल्या १४ ट्रीज या उपक्रमाबाबत कळले. चासजवळील वेताळे टेकडीवरील भागात सोसायटीमधील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रिस्टोरेशनचे काम सुरू होते.  आपण जे काही या कोर्समध्ये शिकलो ते प्रत्यक्ष अनुभवायला मिळेल या कल्पनेने मीसुद्धा या उपक्रमात सहभागी झाले. 

भीमाशंकरच्या सदाहरित अभयारण्या्च्या अगदी जवळ असूनही हा भाग पर्जन्यछायेत मोडतो. त्यामुळे पाण्याची कमतरता आणि उन्हाळ्यात लागणारे वणवे अशा या भागातील मुख्य अडचणी होत्या. पाण्याच्या व्यवस्थेवर काम करण्यासाठी व वारंवार लागणारे वणवे रोखण्यासाठी, निधी आणि मनुष्यबळ उभारण्याची गरज होती. प्रवीण भागवत यांनी या भागाची नैसर्गिक पुनरउभारणी करण्यासाठी निधी व योग्य मनुष्यबळ हे दोन्ही खांब उभे केले आणि आजही ते त्याचा विस्तार करण्याच्या  प्रयत्नात आहेत. वेताळेच्या ग्रामस्थांची रिस्टोरेशनच्या कामात मदत झाली, व त्यामुळे अनेकांना रोजगारही मिळाला.

आज रोजी प्रकाश गोळे सरांच्या तत्त्वांमुळे बरेचजण या उपक्रमामध्ये जोडले जात आहेत. भविष्यात तयार झालेल्या जंगलामुळे आपोआप पाणलोट व्यवस्थापनाचे सर्व फायदे या गावातील ग्रामस्थांना मिळतील आणि स्थानिक वृक्षांनी तयार झालेल्या जंगलाची अनेक मूल्ये सगळ्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळतील. आजूबाजूच्या सर्व गावांच्या जमिनीमध्ये योग्य पोषकद्रव्ये आणि भूजलामध्ये वाढ होईल.  १४ ट्रीजच्या काही भागांमध्ये गेल्या काही वर्षांपासून रिस्टोरेशनचे काम आधीच झालेले दिसले. अशा भागातील पक्षी, फुलपाखरे तसेच स्वतःहून आलेल्या स्थानिक वनस्पती हे या कामाचे निर्देशक आहेत.  प्रवीण यांनी सुरू केलेल्या उपक्रमात आपण सगळे जण एकत्र येऊन गोळे सरांची तत्त्वे प्रत्यक्ष अमलात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. लोकसहभागातून पुढे आलेला हा प्रयोग जेव्हा हे जंगल नावारूपाला येईल तेव्हा सगळ्यांच्या समोर येईलच आणि आपण सगळ्यांनी मिळून केलेला हा आराखडा इतर जणांसाठीसुद्धा मोलाचा ठरेल.



Comments