मिरजोळी
एखाद्या युवतीलाही लाजवेल असं मनोहारी सौंदर्य असणारी मिरजोळीची फळं
सध्या कोकणात खाडीकिनारी फिरताना सर्रास पाहायला मिळतील. कालची एक महापर्वणी
म्हणजे आमच्याइकडच्या पंगेरे-बाकाळ्याच्या बांधावरून जाताना रस्त्याच्या कडेने या
मिरजोळीच्या फळांच्या चारही अवस्था एकाच नजरेच्या पट्ट्यात बघायला मिळाल्या.
नवरात्रात बायका जशा विविधरंगी साड्या नेसून मुरडतात तशीच ही मिरजोळी
विविधरंगाविष्कार दाखवत होती. काही हिरवट पोपटी, काही तांबडट
गुलाबी, काही जांभळट काळी, तर काही पांढरीशुभ्र! उपलब्ध
माहितीनुसार या फळांच्या चार अवस्था आहेत. कोवळी असताना फळं हिरवी असतात, मग
पांढरी होतात, मग गुलाबी होतात, आणि शेवटी काळी होतात. यात सर्वांत
सुंदर दिसतो तो गुलाबी रंग! पाकात घातलेल्या बुंदीसारख्या पाणीदार गोल टपोरी
फळांचे लगडलेले घोस! अप्रतिम नजारा!
'मिस्वाक टूथपेस्ट' ची जाहिरात सर्वानी पाहिलीच असेल,
नाही
का? या टूथपेस्टला 'मिस्वाक' हे नाव कशावरून
पडलं? तर ते एका वनस्पतीचं नाव आहे. आता, ही वनस्पती
कुठली? अहो हीच ती मिरजोळी!! बसला कि नाही आश्चर्याचा धक्का? आपण
रोज जातायेता जे बघतो ते काय आहे हे आपल्यालाच माहित नसतं, आणि जेव्हा
माहित होतं तेव्हा असे सुखद आश्चर्याचे धक्के बसतात.
मिरजोळी - Salvadora persica. पीलू, खाकण
अशा अन्य नावांनी परिचित असलेली, भारतात आणि जगात विपुल ठिकाणी आढळणारी,
कोकणात
खाडीकिनारी झळकणारी एक कांदळवन सहप्रजाती. गावात आणि कोकणात बहुतांश ठिकाणी ही 'मिरजोळी'
या
नावानेच ओळखली जाते. चिपळुणच्या जवळ 'मिरजोळी' नावाचं गाव आहे,
तसंच
रत्नागिरीजवळ 'मिरजोळे' नावाचं गाव आहे, या गावांचा या वनस्पतींशी काही संबंध
असेल का? नसेलही! (उगाच साम्यस्थळ दिसलं म्हणून शंका!😝)
गावातल्या लोकांना या वनस्पतींबद्दल विचारल्यावर अनेकांनी सांगितलं
की हिच्या फळांचं पूर्वी तेल काढायचे व ते गुढघ्यांना वगैरे लावायला उपयोगी
पडायचं. हल्ली कुठेही तेल काढलं जात नाही कारण पारंपरिक घाणेच बंद पडले. मात्र
अलीकडे 'पीलू ऑइल' या नावाने याचं तेल बाजारात मिळतं आणि ते साबणनिर्मितीमध्ये वापरतात.
मिरजोळीच्या बियांमध्ये ३० ते ३५ टक्के तेलांश असतो अशी माहिती मिळते.
दात घासण्यासाठी प्राचीन काळापासून उपयोग होत असल्यामुळे 'टूथब्रश
ट्री' या नावाने ही वनस्पती जगात परिचित आहे. अरब राष्ट्रांमध्ये हिचा वापर
खास करून पूर्वापार होतो. मिरजोळीची मुळं किंवा बोटभर लांबीच्या फांद्या घेऊन त्याचं एक टोक चेचून ब्रशसारखं करून
त्याने दंतावण केलं जायचं. दातांच्या आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी असलेला याचा
औषधी उपयोग जागतिक आरोग्य संघटनेनेही मान्य केला आहे. अलीकडे या वनस्पतीचा अर्क
टूथपेस्ट निर्मितीत वापरतात.
मिरजोळीची फळं खाद्य आहेत असं म्हणतात, परंतु कधी खाऊन
बघितलेली नाहीत. (आणि खात्री असल्याशिवाय कृपया कोणी खाऊन पाहू नयेत.). फळांत
बुळबुळीत बलक असतो.
अशी ही विविधरंगी आणि विविधगुणी मिरजोळी सध्या आमच्याइकडच्या
पंगेरे-बाकाळ्याच्या बांधाच्या कडेने भरघोस फळली आहे.
By the way, कोकणातल्या आमच्या अणसुरे गावाचं
"लोकजैवविविधता संकेतस्थळ" तयार होतंय...त्याबद्दल लवकरच...🙂
- हर्षद तुळपुळे
मु. पो. अणसुरे,
ता. राजापूर, जि. रत्नागिरी
x
Comments
Post a Comment