जाणीवपूर्वक वास्तव जग जाणण्यासाठी आणि मजेत जगण्यासाठी

 


आज आपण मजेत जगत आहोत का? स्वतःलाच प्रश्न विचारला, तर बहुतांश उत्तर देतील मजेत जगण्यासाठी वेळ आहे का?

अहो आज तंत्रज्ञानामुळे किती सोयी-सुविधा निर्माण होत आहेत! 

पण कष्ट कमी होत आहेत का?

उलट आता रोज १५ - १५ तास काम करावे लागते तेंव्हा कोठे थोडा आधार मिळत आहे?

असं का होत आहे हे समजून – उमजून घ्यावयाचे असेल, तर एक धक्कादायक प्रवास करावा लागेल.

अर्थात हा प्रवास म्हणजे वाचायचा प्रयास!

मृणालिनी वनारसे आणि गिरीश अभ्यंकर यांनी लिहिलेले पुस्तक 'जाणिवेची जाणीव'

निसर्ग नियमांच्या प्रकाशातच वास्तव जग आणि कल्पितांच्या जगाचे  स्वरूप जाणता येणे शक्य आहे असा लेखकांचा दावा पुस्तक जस जसे वाचत जाऊ तस तसे पटत जाते. निसर्ग नियम, उत्क्रांती आणि जनुक शास्त्र यांची उत्कृष्ट सांगड घालून अनेक प्रश्नाची उत्तरे समाधानकारकरीत्या मिळू शकतात हा लेखकांचा  दावा मान्य व्हायला हरकत  नाही असे वाटते.

अर्थात यांसाठी लेखकांनी अभ्यास, चिंतन आणि मनन केले आहे व त्या जोडीला आधी केले मग सांगितले याची प्रचिती पुस्तक वाचताना येते. 

प्रत्येक विधानामागे ते वैज्ञानिक आहे का , निसर्ग नियमांना अनुसरून आहे का हे पाहूनच ते मांडले गेले आहे हे मान्य व्हायला हरकत नाही. त्यासाठी पूर्वग्रह बाजूला ठेवून पुस्तक वाचावे असे मला वाटते. त्याच जोडीला वास्तवात जगताना येणाऱ्या मर्यादेचेही भान ठेवावे लागते. 

 पुस्तकाची सुरुवात 

१. आपल्या आजूबाजूचं वास्तव जग, अगदी आपणसुद्धा काही निसर्गनियमांनी बांधलेलो आहोत. 

२. या नियमांच्या परिणामांशी सुसंगत असं आपलं वर्तन असेल तर आपल्याला त्रास होण्याची शक्यता कमी, सुसंगत नसेल तर त्रास होण्याची शक्यता अधिक 

३. आपल्याला आपल्या वर्तनात बदल घडवून आणता येण्याची शक्यता असते

अर्थात पहिली दोन  विधाने कळली, समजली तरी तिसरे विधान प्रत्यक्ष्य आचरणात आणणे अवघड जाऊ शकते याचे भान ठेवणे जरुरीचे आहे.

गिरीश अभ्यंकरांची ओळख फार मजेशीरपणे करून दिली आहे. त्यातील फक्त दोन पाहू.

१. विविध स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदा, संमेलने, कार्यशाळा यांतील त्यांचा आयोजक, वक्ता किंवा निमंत्रित म्हणून सहभाग - शून्य (त्यांना प्रवास आवडत नाही) 

२. सामाजिक चळवळीमध्ये ते कायम शेवटी किंवा गैरहजर असतात (ते चळवळे नाहीत)  

गिरीश अभ्यंकरांची आणखीन ओळख होण्यासाठी पान  ९ अवश्य वाचावे.

त्यांचे  व्यक्तिमत्व कसे असेल याची  कल्पना येऊ शकेल त्याच बरोबर ते कोणाला शालजोडीतून मारतात हे समजू शकेल पण ते त्यामागे वैज्ञानिक सत्य आहे हे पटवून देऊ शकतात आणि ऐतिहासिक कारणमीमांसा करू शकतात. 

माणूस वस्तुनिष्ठ, व्यक्तीनिष्ठ आणि समुदायनिष्ठ या तीन जगांचा रहिवासी असतो हे नीट समजून घेतले पाहिजे जे पुस्तकातून स्पष्ट व्हायला मदत होते.

आपण पुस्तक वाचून मनन आणि चिंतन केले तर निश्चितपणे म्हणता येईल कि निसर्गनियमांचा अन्वयार्थ हे लेखकांचे मोठे भरीव योगदान आहे. 

मी पुस्तकातील काही विधाने उदधृत करू इच्छतो जी मला अधिक भावली, अर्थात एकल विधानांनवरून कधी कधी अर्थबोध होणार नाही हे मी मान्य करतो. आपणास त्याची सत्यता पटण्यासाठी स्वतः पुस्तक वाचणे अत्यंत महत्वाचे ठरते.

विज्ञान म्हणजे वस्तुनिष्ठ नैसर्गिक घटनांचा पद्धतशीर अभ्यास, निसर्गनियमांचा शोध. 

मानवी जीवनातील सद्यस्थितीची कारणं / स्पष्टीकरणं मिळण्यासाठी उत्क्रांती सिद्धांताचा आधार घेता येऊ शकतो.

वैज्ञानिक माहिती आपल्या पूर्वग्रहांशी विसंगत असू शकते, पूर्वग्रहांना बसणारा धक्का हा खोडसाळपणाचा वाटू शकतो. प्रथा, परंपरा, आदर्श, संस्कृती, श्रद्धास्थाने यांची विज्ञानाच्या आणि उत्क्रांती थिअरीच्या नावाने वस्तुनिष्ठता तपासणं संतापजनक वाटू शकतं. ते सहन करणं अवघड असलं तरी वैज्ञानिक माहिती ज्याविपरीत काहीही घडत नाही अश्या निसर्गनियमांनुसार आधारित असल्याने आपले समज वैज्ञानिक माहितीशी  सुसंगत ठेवणं श्रेयस्कर आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील नेमका फरक लेखक अचुकपणे सांगतात. विज्ञानाच्या प्रकाशात तंत्रज्ञानाला तपासता येऊ शकतं हे खरं आहे पण ते प्रस्थापित विकासाधारित मार्गाला गैरसोयीचे आहे. कार्बन युग आणि सिलिकॉन युग यांच्या बाबतीतील लेखकांचा अभ्यास विशेष उल्लेखनीय आहे. 

तंत्रज्ञानाची निर्मिती, वापर, व्यवस्थापन, त्यातून निर्माण झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट हा एक कधीही न संपणारा प्रकल्प.

भावुकपणा, श्रद्धेला कोठेही थारा नाही, या लेखकांच्या रोख-ठोकपणाला दाद दिलीच पाहिजे.

पुस्तकात पान ३९वर प्रख्यात उत्क्रांतिशास्त्रज्ञ ई ओ विल्सन म्हणतात आपण आज कसे आहोत? याबाबतचा उतारा

आपल्या भावभावना या अजूनही गुहेत राहण्याऱ्या प्राचीन माणसाच्या आहेत, आपल्या सामाजिक संस्था/ रचना या ऐतिहासिक / मध्ययुगीन काळातल्या आहेत आणि आपल्या आजूबाजूला दैवी वाटावं असं तंत्रज्ञान आहे. कशी तोड काढायची?

आज आपल्या आजूबाजूला जे तंत्रज्ञान आहे ते विजेशिवाय शक्य नाही. वीज या तंत्रज्ञानाचा कणा आहे, वीज आपल्या जीवनशैलीचा कणा आहे. यावर दुमत होण्याचे कारण नाही. (पान  ४१)

युद्ध आणि तंत्रज्ञान यांची तर विशेष जोडगोळी आहे. (पान ४६)

 विज्ञानाची प्रक्रिया नेमक्या शब्दात सांगितली (पान ४९). ते नीट समजून घेतले पाहिजे.

कोणत्याही निरीक्षणाचे कारण/ स्पष्टीकरण निसर्गनियम किंवा त्याचे परिणामस्वरूप – traceable to The Laws of Nature असलं तरच ते वैज्ञानिक ठरतं. कारण/ स्पष्टीकरण वैज्ञानिक असेल तर काय अशक्य आहे हेही समजतं कारण निसर्गनियमांच्या विपरीत काहीही घडत नाही. उदा. अविनाशित्वाचा नियम हा नियम असं सांगतो की द्रव्य आणि ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. त्यांच्या स्वरूपात फरक पडू शकतो.

अणु, सौर पवन व इतर अपारंपरिक ऊर्जास्रोतांनी खनिज इंधनापासून मुक्ती मिळवणं का शक्य नाही हे कळलं तर असे प्रयत्न करण्यातील श्रम व संसाधने वाचू शकतात हे लेखकांचे मत अगदी पटते.

वैविध्य / विविधता आणि अनिश्चितता सर्वत्र असते म्हणून ती मानवी जीवनातही अंगभूत आहेत. शून्य कचरा, शून्य कार्बन या संकल्पनाच मुळात अवैज्ञानिक आहेत हे पटते. विरंगुळा म्हणून लोक असे खेळ खेळत राहतात. त्यात त्यांचे मनोरंजन होते व त्याच बरोबर समाजालाही गुंगवता येते. 


समर्थ रामदासांनी मूर्खांची लक्षणे सांगितली आहेत. ती वाचताना जाणवते कि मला समोर ठेवूनच समर्थानी लिहिलेली असावीत कारण ती आपणास तंतोतंत लागू आहेत. तसेच हे पुस्तक वाचताना प्रकर्षाने जाणवते. कारण निसर्गनियम सजीव व निर्जीव सर्वानाच लागू होतात हे वास्तव, सत्य मान्य न करता सरळ सरळ फसवून करमणूक करण्याचा उद्योग चालू आहे हे दिसून येते. आपण प्रत्येक गोष्ट पैशात मोजतो व तेथेच गफलत होते. वास्तविक पाहता द्रव्य व ऊर्जा  किती लागते त्यावर आपण  मोजले पाहिजे. नाही का?

फ्रेंच शास्त्रज्ञ सादी कार्नो यांना 'फादर ऑफ थर्मोडायनॅमिकस' समजलं जातं. ऊर्जा आणि द्रव्याचा पहिला नियम, अव्यवस्था (disorder ) याऐवजी विखुरण (dispersal) हे समजून घेणे आवश्यक आहे. 

शून्यातून कशाचीही निर्मिती करणे अशक्य आहे हे वस्तू (द्रव्य) आणि ऊर्जा यांच्या अविनाशित्वाच्या नियमावरून समजते.

या पुस्तिकेच्या सहलेखिका, मृणालिनी वनारसे म्हणतात 'गिरीश अभ्यंकर ( या पुस्तकाचे लेखक) या संशोधकाने ( माझ्या मते विचारवंत सुद्धा पण त्यांना हे विशेषण आवडणार नाही) एकूणच सांगड घातली. सूक्ष्मकण, त्यांची एकमेवाव्दितीय जागा आणि त्यांचा प्रभाव पाडणारे असंख्य  फोर्सस यांच्या परिणामस्वरूप त्यांचं विखुरण होण्याची वैज्ञानिक कारणं स्पष्ट केली आणि त्याचा परिणाम सर्वत्र विविधता आणि अनिश्चितता असण्यात होतो हे दाखवून दिले. मी या मताशी १०० टक्के सहमत आहे

सर्व सजीवांना एंट्रोपी नियम लागू आहेत. ते अपवाद नाही.

विखुरण (डिस्पर्सल ) सावकाश असू शकतं पण ते पूर्णपणे थांबत कधीच नाही आणि यामुळे कोणताही सजीव अमर बनणे शक्य नाही.

प्रत्येक चॅप्टर , प्रत्येक परिच्छेद मन एकाग्र करून वाचले तरच नीट आकलन होऊ शकेल. तंत्रज्ञान आणि एंट्रॉपीचा नियम, एंट्रॉपी नियमाचे परिणाम विशेष करून वाचावे असे मला वाटते 

१.एंट्रॉपी नियमाच्या  परिणामस्वरूप प्रत्येक तंत्रज्ञान हे जात्याच हमखास अकार्यक्षम असते. 

२. अढळपणे तोट्यात असलेल्या तंत्रज्ञानामुळे एक समस्यां सोडवताना दुसऱ्या आणखीन मोठ्या समस्या तयार होत आहेत ( म्हणूनच खूप जणांना १५ ,१५ तास काम करावे लागत आहे)


पुस्तकाचे अंतरंग पाहिले असता लेखकांची विविध विषयांवरील जाणिव सखोल असावी यांचा अंदाज येतो व जस जसे पुस्तक वाचत जाऊ तस तसे आपले मत दृढ होत जाते. आपणास धक्के बसतात हे मान्य करावे लागेल. 

उदा. १. जीवसृष्टीचा इतिहास सांगतो की निर्जीवापासूनच जीवाची निर्मिती सुमारे चार अब्ज वर्षांपूर्वी झाली. त्यामुळे निसर्गनियम जसे सर्व निर्जीव गोष्टींना लागू असतात त्याप्रमाणे सर्व सजीवांनाही लागू असतात. उत्क्रांती स्वैर बदलणे व नैसर्गिक निवडीने होत असल्याने उत्क्रांतीला कोणतीही दिशा नाही की उद्देशही नाही. (पान ७८)

विस्तृत अभ्यासातून असं दिसतं की आपल्यासारख्या प्राण्यांची वागणूक व व्यवहार अंदाजे ७० टक्के त्यांच्या जनुकांनी निबद्ध असतात आणि उर्वरित ३० टक्के भाग बहुतांशी जन्मापासून सुरवातीच्या काळात काय ठसलं गेलं ( imprinting in window period) यावर अवलंबून असतो (पान ८०)

तथाकथित आधुनिक समाजामद्धे, आधुनिक वैज्ञानिक विचारसरणीची अज्ञानपिपासा दिसते.

पुस्तक लिहिण्याच्या मागचे लेखकांचे प्रयोजन समजण्यासाठी पान ८६ आवर्जून वाचावे.

विस्तारभयास्तव  येथून पुढे लेखकांची काही वाक्ये  मी पुढे उद्धृत करतो. अर्थात पूर्ण पुस्तकच वाचणे श्रेयस्कर आहे. काही भाग माझ्या भाषेत लिहीत आहे.

सजीव म्हणजे 'जैवरासायनिक अल्गोरिदम' 

कार्बन संरचना आणि सिलिकॉन  संरचना यांच्यामधील तुलना आणि त्यावर सविस्तर विश्लेषण (पान ९५ ते ९७)

कार्बन जीवनातली उत्क्रांतीत यजमान- परोपजीवी अशीही एक स्पर्धा असते, सहजीवनही असते. ...... कार्बन जीवनातली परोपजीवी त्यांच्या यजमानांपेक्षा खूप जास्त टिकले आहेत. उदा. अमिबा (पान १०३)

सिलिकॉन - जीवन आता माणसात शारीरिक बदल घडवू पहात आहे. कदाचित कार्बोसिलिकॉन - जीवन अस्तित्वात येईल. हा उत्क्रांतीचा पुढचा टप्पा असेल. (पान १०४)

पान  १०६ पासून परिशिष्ठे सुरु होतात. प्रत्येक परिशिष्ठ आगळे वेगळे आहे. 

कच्चा माल निसर्गात उपलब्ध असतो. त्यातून वस्तू बनविण्यासाठी ऊर्जा लागते. बृहद दृष्टिकोनानुसार आपण ऊर्जाच विकत घेत असतो. ऊर्जेचे पैशातील व्यवहार म्हणजे अर्थव्यवहार होय. पैसे हे केवळ मानवीय संकल्पना आहे. पैशाला वस्तू- उर्जेप्रमाणे नैसर्गिक मूल्य नसते. (पान  १३०)

पृथ्वीवरील मेंदू असलेले सर्व सजीव आपापल्या भवतालातील कठोर वास्तवाशी जुळवून घेत, झगडत जगत असतात. त्यांना वास्तव जसे आहे तसे स्वीकारावे लागते; फारतर टाळता येते. तंत्रज्ञान - विकासामुळे माणूस कठोर वास्तवात सोयीस्कर बदल करू शकतो. पण ...... (पान १४३)

एंट्रॉपीच्या नियमानुसार अपारंपरिक - ऊर्जा स्रोत खनिज इंधनांची जागा कधीही घेऊ शकणार नाहीतच (पान १५२)

वृक्ष लागवड माणसांनी पायी जाण्याच्या अंतरात टिकाव फावड्याने केली व ओला-कचरा, सांडपाणी किंवा पावसावर रोपं जगवली तर ठीक पण हे सर्व काम होतं भरपूर इंधन खर्चून. अशा मोहिमेत जगलेली झाडे त्याच्या ( खनिज- इंधन ज्वलनामुळे हरितगृहवायू उत्सर्जन करून) कितीतरी पट जास्त ते वृक्षारोपणमोहीम राबवताना बिघडतं (पान १५३)

पान १५६ वर पुस्तकाचे लेखक एक धक्कादायक विधान करतात - सोपा उपाय म्हणजे पुढची पिढी जन्माला न घालणं .. 

अर्थात मी पूर्ण परिच्छेद लिहिलेला नाही. पण मला वाटते की हा उपाय ९९.९९९९  टक्के लोकांना मान्य होणार नाही. व उत्क्रांती, सजीवांची जगण्यासाठी धडपड आणि पुनरुउत्पादनाची नैसर्गिक आंच, स्वार्थी जनुकं, पुरुष प्रधान संस्कृती, कुटुंब पद्धती, समाजाची मानसिकता व आज पर्यंत माणूस विवेकाने वागला आहे हे दिसून येत नाही. त्यामुळे  मूल जन्माला न घालणं हे मृगजळ वाटते.

हे पण वास्तवच नाही का?

आरोग्य, उष्णता, सॉफ्ट (तंत्रज्ञान ) जीवनशैली, जेष्ठ नागरिक हि परिशिष्ठे आवर्जून वाचावीत.

 विरंगुळा, तत्त्वचिंतन आणि समारोप ही तीन परिशिष्ठे वाचल्यानंतर लेखकांची वैचारिक उंची, प्रगल्भता यांना दाद दिलीच पाहिजे. 

पुस्तकाचे लेखक म्हणतात त्रिकालाबाधित सत्य काय? निसर्गनियम.

पुस्तकाचे लेखक म्हणतात जाणिवेची जाणीव प्रवाहात सोडलेला एक दिवा! 

माझे मत - पण तो प्रखर आहे! सावधान!

थोडक्यात पुस्तकासंबद्धी माझ्या अल्पमतीनुसार लिहिले आहे. थोडा विस्कळीतपणा जाणवेल. त्याबद्दल क्षमस्व. आपण आवर्जून वाचावे ही माझी शिफारस. 

पुस्तक पाहिजे असल्यास संपर्क – 

Zankar Audio Cassettes, Zankar Educational Studios.

Contact details- 9765081298, 9850009825

Website: www.zankarstudios.com

E-mail- zankarstudios@gmail.com


- सुहास सापटणेकर






Comments